ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने पाण्यासाठी दिव्यात होणार अनोखे आंदोलन
दिवा (प्रतिनिधी):- दिवा शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्यास साठवण टाक्या सुरू नसणे हे कारण असून पाणीटंचाईस कारण असणाऱ्या बेतवडे येथील बंद स्थितीतील जल कुंभाचे पूजन करून पाणी समस्या सुटण्यासाठी गाऱ्हाणे घालण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला असून या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना पालिका आयुक्तांचे दिव्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधणार आहे.
ज्योती पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,दिवा शहरात अंतर्गत जलवाहिन्या न टाकल्या गेल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा आजही सामना करावा लागत आहे. दिवा शहरासाठी नवीन पाणी योजना अस्तित्वात येऊनही पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. मनमानी पद्धतीने पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा लाईन टाकल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झालेला आहे. अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याबरोबरच दिवा शहरात जल कुंभ उभारणे आवश्यक होते. मात्र महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षात येथे नव्याने जलकंभ उभारले नाहीत. जागा उपलब्ध नसल्याचे कारण पालिका प्रशासन देते मात्र दुसरीकडे दिवा शहरात २०१२ पूर्वी उभारण्यात आलेले बेतवडे येथील दोन जलकुंभ वापराविना बंद स्थितीत आहेत. यावर महापालिकेचा करोडोंचा निधी खर्च झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या या जलकुंभ मुळे दिवा शहरासाठी पाणीपुरवठा होऊ शकत नाही अशी स्थिती असल्याकडे ज्योती पाटील यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणे गरजेचे आहे. या दोन जल कुंभांकडे लक्ष वेधण्यासाठी पाणीटंचाईचे स्मारक असणाऱ्या या दोन्ही जल कुंभाचे पूजन दिवा शहरातील महिलांच्या वतीने आम्ही करणार आहोत असा इशाराही ज्योती पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
आपण लक्ष न दिल्यास लवकरच दिवा शहरातील महिला या बंद स्थित असणाऱ्या जलकुंभाचे पूजन करून दिवा शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठीचे गाऱ्हाणे घालणार आहेत.
तरी आपण दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येची नोंद घ्यावी व सदर जलकुंभ तातडीने सुरू करावेत अशी विनंती ज्योती पाटील यांनी या पत्रात केली आहे.