Homeठाणे-मेट्रोबेस्ट बसचा ठाण्यात अपघात ; बस चढली दुभाजकावर

बेस्ट बसचा ठाण्यात अपघात ; बस चढली दुभाजकावर

४ ते ५ प्रवासी जखमी
ठाणे:- बोरिवली स्टेशन वरून ठाणे पूर्व स्टेशनकडे ३० प्रवासी घेऊन निघालेल्या बेस्ट बस रस्त्याच्या दुभाजकावर चढून अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कोपरी पुर्व या ठिकाणी असलेल्या सीएनजी पंपच्या पुढील सेवा रस्त्यावरती समोर आली. या घटनेनंतर ४ ते ५ जखमी प्रवाशी स्वतः हुन बसमधून उतरून खासगी रुग्णालयात गेले. तर दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
बेस्ट बस चालक सुशांत मोहिते हे वाहक महाले यांच्या मदतीने बोरिवली स्टेशन येथून ठाणे पूर्व स्टेशनला बस घेऊन निघाले होते. ती बस ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, हॉटेल अयुग समोरील सेवा रस्त्यावर येताच, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर बस रस्त्याच्या दुभाजकावर चढून अपघात झाला. ही घटना घडली तेंव्हा बस मध्ये अंदाजे ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली होती. ते सर्व प्रवासी स्वतः हुन बस मधून उतरून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले आहेत. तर कपाळाला व पाठीला दुखापत झाल्याने राजेश मालुसरे (२७) आणि नाकाला दुखापत झालेल्या सुहास वाघमारे (४७) या दोघांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती बस चालकाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, बेस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ओलेक्ट्रा कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली होती. तसेच अपघातग्रस्त बस रस्त्याच्या एका बाजूला घेण्याचे काम तातडीने हाती घेतल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!