Homeठाणे-मेट्रोबेस्ट बसला धडकून ट्रक उलटला ; बेस्ट वाहक जखमी

बेस्ट बसला धडकून ट्रक उलटला ; बेस्ट वाहक जखमी

अपघाताने घोडबंदर रोड रोखला

ठाणे:- घोडबंदर रोडवरील गायमुख पोलीस चौकीजवळ
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बेस्टच्या मिनी बसला एका बाजूला धडक दिली. त्यानंतर तो ट्रक रस्त्यावरती जाऊन उलटल्याने रिकाम्या दारूच्या काचेच्या बाटल्या आणि बॉक्स रस्त्यावर पसरल्याने जवळपास अडीच तास रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच या घटनेत बेस्ट वाहक हर्षल कासकर (३२) हे जखमी झाले असून हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास समोर आला. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर पहाटेच्या सुमारास तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा झाला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
बेस्टची रिकामी मिनी बस घेऊन चालक प्रताप पवार आणि वाहक हर्षल कासकर हे दोघे मिरा रोडवरून मुलुंड डेपोला निघाले होते. ती बस घोडबंदर रोडवरील गायमुख येथे आल्यावर पाठी मागून भरधाव वेगाने ट्रकने बसच्या एका बाजूने धडक दिली. तसेच तो ट्रक पुढे जाऊन रस्त्यावरती उलटला. हा प्रकार मध्यरात्री सव्वा तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास समोर आला. या घटनेची माहिती वाहतूक पोलीस जयदत्त मुंडे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. तात्काळ वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. या घटनेत बस वाहक कासकर यांच्या उजव्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे पुढे आले. याचदरम्यान उलटलेल्या ट्रकमधील रिकाम्या दारूच्या काचेच्या बाटल्या आणि बॉक्स रस्त्यावर पसरले होते. तसेच ट्रकची बॉडी कमकुवत असल्याने ते उचण्यास विलंब होत होता. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर तो अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात यश आले. तसेच त्या बाटल्या आणि बॉक्स जेसीबीच्या साहाय्याने एका बाजूला केल्यानंतर जवळपास अडीच तासांनी वाहतूक सुरळीत सुरू झाली. अपघातग्रस्त ट्रक घेऊन चालक दीनानाथ गुप्ता हे गुजरात येथून मुंबईला निघाले होते. याचदरम्यान त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!