सडेतोड/सुहास खंडागळे
भाजपचा बदललेला मंडळ अध्यक्ष सध्या दिव्यात चर्चेचा विषय आहे.पक्ष मजबुती साठी संघटनात्मक बदल केले असल्याचे भाजप सांगत असली तरी दिव्यात मात्र युतीच्या राजकारणात रमाकांत मढवी हेच किंग असल्याची चर्चा जोरात आहे.मढवी यांनी केलेल्या राजकीय खेळीमुळे मागील पाच वर्षे संघर्ष करणारा मित्र पक्ष काहीसा शांत होईल असे चित्र आता दिव्यात आहे.
दिव्यात शिवसेनेला डोईजड झालेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी बदलत सचिन भोईर यांची वर्णी मंडळ अध्यक्ष म्हणून लावली.मंडळ अध्यक्ष बदलणे हा भाजपचा पक्षांतर्गत विषय. मात्र याच विषयात रमाकांत मढवी यांची चर्चा होणे ही गोष्ट मढवी यांची दिव्यात ताकद वाढल्याचे प्रमाण आहे.शिवसेनेच्या दबावातून रोहिदास मुंडे यांना हटवले असे बोलले जाणे हे भाजपच्या राजकीय वाटचालीसाठी चांगले नाही. यामुळे भाजप बॅकफूटवर जाण्याची शक्यता अधिक आहे.रमाकांत मढवी यांच्या राजकीय डावपेचांनी याआधीच भाजप अनेक वेळा गोंधळात पडलेली असताना आता तर सुरू असणाऱ्या चर्चांनी मढवी यांचे युतीतील नेतृत्व निर्विवाद सिद्ध केले आहे. मढवी यांना डावलून दिव्यात युतीचे राजकारण होणार नाही असाच काहीसा मेसेज या चर्चेमुळे जात असल्याचे बोलले जाते.भाजपचा मंडळ अध्यक्ष हटविण्यासाठी शिवसेनेचा दबाव या कदाचित राजकीय चर्चा असतील.या होणाऱ्या चर्चांचा साधा सोपा अर्थ काढायचा म्हटला तर मढवी जिंकले आहेत…आता पराभव कुणाचा झाला हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे!