ठाणे : – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “महाश्रमदानः एक दिवस, एक तास, एक साथ” हा विशेष उपक्रम आज, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमात पंचायत समिती सदस्य, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, विभाग प्रमुख, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वच्छतेच्या या लोकचळवळीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केला.
महाश्रमदानात सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते व महामार्ग, रेल्वे स्थानके, घाट, नाले, धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, कार्यालयीन परिसर व बाजारपेठा या ठिकाणी व्यापक स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.
“ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले असून, ठाणे जिल्हा स्वच्छतेच्या दिशेने आदर्श निर्माण करेल,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन विभागाचे विभाग प्रमुख पंडित राठोड यांनी व्यक्त केला.