Homeठाणे-मेट्रोमहिंद्र पिकपची दोन रिक्षांना धडक ; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

महिंद्र पिकपची दोन रिक्षांना धडक ; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

चालक अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब आली पुढे

ठाणे: घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्क जवळ महिंद्र पिकप या वाहनाने मागून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना एकामागून एक अशी जोरदार धडक दिली. त्यानंतर ते पिकप वाहन मेट्रो कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उलटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षात बसलेल्या एकाचा मृत्यू तर आणखी एक जण जखमी झाला आहे. त्यातच पिकप चालक हा अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
घोडबंदर रोड येथील रहिवाशी असलेला साईकृष्णा मनोज बिस्वाल (१५) असे पिकप चालकाचे नाव असून तो सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडने ठाण्याकडे पिकप वाहन घेऊन जात होता. सूरज वॉटर पार्क येथे आल्यावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या दोन रिक्षांना जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरात होती की, रिक्षांमधील वर्तकनगर येथील जितेंद्र मोहन कांबळे (३१) यांचा मृत्यू झाला तर गणेश विश्वनाथ वाघमारे (२९) हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान रिक्षांना धडक दिल्यानंतर ते पिकप वाहन रस्त्याच्या बाजूला मेट्रो कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन उलटले. या अपघातानंतर चालक साईकृष्णा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली अपघातग्रस्त वाहने वाहतूक पोलिसांनी टोइंग वाहनाच्या साहाय्याने एका बाजूला केले. अपघात मृत पावलेले कांबळे आणि जखमी वाघमारे असे दोघे वेगवेगळ्या रिक्षांमध्ये बसले होते.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!