दिवा:-भाजपच्या दिव्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने शहरात भाजपने 15000 सदस्यांची नोंदणी केली आहे. संघटना मजबुती करण्यासाठी सर्वच मेहनत घेत आहेत. सर्वांच्या सोबतीने मागील दीड वर्षात केलेलं काम आणि सहकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास यामुळे पुन्हा दिवा शहर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, असे मत सचिन भोईर यांनी दिवा न्यूज सोबत बोलताना व्यक्त केले.
सचिन भोईर यांची पुन्हा दिवा शहर मंडळ अध्यक्षपदी भाजप नेतृत्वाने निवड केली आहे. याबाबत बोलताना सचिन भोईर यांनी पक्षाच्या नेतृत्वाने दाखवलेला विश्वास व दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी दिलेली साथ याबाबत आभार व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागील दीड वर्ष मंडळ अध्यक्ष म्हणून काम करत असून पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपला भर असल्याचे सचिन भोईर यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ध्येयधोरण दिवा शहरातील प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगताना हरघर भाजप हे अभियान दिव्यात यशस्वी करून दाखवणार असल्याचा विश्वास सचिन भोईर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिवा शहर मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सर्वच पदाधिकाऱ्यांची मेहनत यामुळे भारतीय जनता पार्टी दिवा शहरात सदस्य नोंदणी मध्ये आघाडीवर असून आगामी काळामध्ये येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असेही सचिन भोईर यांनी यावेळी बोलताना सांगितले.