ठाणे काँग्रेसचा फडणवीस सरकारवर थेट आरोप ! मेट्रो प्रकल्प फक्त निवडणुकीसाठी गाजावाजा – नागरिकांचा त्रास कायम
ठाणे : – दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त असताना, ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की, मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे; प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे. काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले, “फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता, फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे, ही खरी चाचणी नाही, तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे.”
ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती, तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरूवात झाली. मात्र, आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत, पिलर्स उभे नाहीत, कारशेड अर्धवट असून स्टेशन व बोगींची कामे अधूरी आहेत. मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत. काँग्रेसचे आरोप आहेत की, फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत आहे, प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही. खर्च कोट्यवधीत वाढला असूनही नागरिकांचा त्रास कायम आहे.
त्याचबरोबर, घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्याने वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स पोहोचणे कठीण होईल. स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेने सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरू ठेवले आहे. स्व. काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली, तरीही सरकारने जनतेचा विश्वास न घेता काम सुरू ठेवले.
विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिला की, “जर सरकारने सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही, तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठे जनआंदोलन उभारेल.” ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचे आश्वासन देणे, आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणे हे फडणवीस सरकारच्या धिम्या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे.या पत्रकार परिषदेस ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे, रवी कोळी उपस्थित होते
मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली फडणवीस सरकारने ठाणेकरांना फसवले असून काम रखडलेले आहे, खर्च वाढला आहे आणि नागरिकांचा त्रास कायम आहे. काँग्रेसने ठामपणे सांगितले की, जनतेसाठी काम न करता फक्त निवडणुकीसाठी गाजावाजा करणारे धोरण स्वीकारले जाणार नाही.