वन विभागाकडून ३० आधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार
कॅमेऱ्याच्या रेंज मधून धावणाऱ्या वन्य जीवाचे छाया चित्र मिळणार
ठाणे :- निसर्गातील जैवसाखळी कुठे तरी अप्रत्यक्षपणे नष्ट करण्याचं काम माणसाकडून होत असून, जंगलतोड वन्य जीवांची शिकार अशा घटना सातत्याने होत आहेत. मात्र याला काहीसा लगाम घालण्यासाठी वन विभागाने पावल उचलली आहेत. येऊर मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभाग ३० आधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवणार असून, जंगलात कोणते वन्यप्राणी आहेत याची माहिती समजणार आहे. परंतु या बरोबर जंगलातील अवैध हालचालींवर नजर ठेण्यासाठी कॅमेरे मदतगार ठरणार आहेत.अशी माहिती वनविभागाने दिली.
ठाणे आणि मुंबई शहराचे हृदय म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओळखलं जात. साधारण १० हजार स्क्वेअर किमी परिसर असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानाचा साठ टक्के भाग हा वन विभागाच्या येऊर रेंज मध्ये मोडतो. मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रीय उद्यानाचा जागा आकुंचन पावते आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील जैव सृष्टीच धोक्यात आली आहे. वन विभाग जंगलातील वन्यजीव आणि वन संपदेचा सुरक्षा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना, आता मदतीसाठी कॅमेराचा तिसरा डोळा नजर ठेवून असणार आहे. विभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर रेंजमधील महत्वाच्या ३० ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत.
४० प्रकारचे आढळून येतात वन्यजीव….
जंगलात बिबटे, माकड, हरण, मुंगूस, रानमांजर, रान डुक्कर असे साधारण ४० प्रकारचे वन्यजीव आढळून येतात. या वन्य जीवांबरोबर जंगलाची देखभाल करण्याची मोठी जबाबदारी वन विभागाकडे आहे. त्यामुळे जंगलाची सुरक्षा अधिक भक्कम होण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यामुळे ट्रॅप कॅमेऱ्यांची ही योजना जंगलाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
“ ट्रॅप कॅमेरे दिवसा बरोबर तितक्याच कुशलतेने रात्री देखील काम करणार आहेत.ट्रॅप कॅमेरा मधून कोणकोणती वन्यप्राणी पक्षी संपदा आपल्या इथे आढळते याचीही माहिती मिळेल. तसेच जंगलात अनधिकृत फिरणाऱ्या व्यक्ती अथवा गुन्हेगार यांच्याकडे देखील लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे उपयुक्त ठरतील.”- मयुर सुरवसे (वन परिक्षेत्र अधिकारी, येऊर )