Homeठाणे-मेट्रोरंगायतनचे नूतनीकरण रडतखडत; अधिकारी - ठेकेदारांना खडसावले..

रंगायतनचे नूतनीकरण रडतखडत; अधिकारी – ठेकेदारांना खडसावले..

१ मे रोजी रंगायतन खुले करा – आ.संजय केळकर

ठाणे: महाराष्ट्राचे वैभव गणले जाणारे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतनचे नूतनीकरण ९० दिवसांत करण्याचे बंधनकारक असताना हे काम रडतखडत सुरू असल्याने ठाणेकर कलारासिकांची कुचंबणा होत आहे. याची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी पाहणी करत अधिकारी आणि ठेकेदारांना खडसावले तसेच काही सूचना करत १ मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी आज शनिवारी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवुन दर्जात्मक काम करताना त्यात दिरंगाई खपवुन घेतली जाणार नसल्याचेही आ. केळकर यांनी बजावले.

ठाणे शहरात सन १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची १९९८ मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता २६ वर्षांनी अंर्तबाह्य नुतनीकरण होत असून त्यासाठी ठाणे महापालिका तब्बल २३ कोटी खर्च करीत आहे. या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार संजय केळकर यांनी केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नुतनीकरणाचे काम सुरू झाले असून ९० दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या कामाला होत असलेला विलंब पाहून आ. केळकर यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी दर्शवत संबधित अधिकारी आणि ठेकेदारांना महत्वपूर्ण सुचना केल्या.

ठाणे शहरातील हे महत्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नुतनीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश आ. केळकर यांनी प्रशासनाला दिले. नाट्यगृहाच्या मजबुतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्यात दिरंगाई होता नये. त्याचबरोबर, विकेण्डला येथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तलावपाळीवर होणारी गर्दी लक्षात घेत लगतच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत भव्य वाहनतळ उभारण्यात यावे. नाट्यगृहाचे पारंपारिकपण जपून उदवाहनाची (लिफ्ट) सुविधा, भव्य रिहर्सल रूम, निकषानुसार आसन व्यवस्था, आधुनिक ध्वनी व्यवस्था आदी सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवुन करण्यात याव्यात, अशा सुचनाही आ. केळकर यांनी केल्या.

डॉ. घाणेकर नाट्यगृहात हॉटेलच्या जागी रिहर्सल रूम करा

ठाणे शहर कलाकारांची पंढरी बनत असून कलाकारांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या वास्तुपैकी एक असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कलात्मक वातावरण हवे, यासाठी तळमजल्यावर असलेले हॉटेल हटवून त्या ठिकाणी रिहर्सल रूम उभारण्याचे निर्देश आ. संजय केळकर यांनी दिले. जेणेकरून अनेक हौशी कलाकारांसह रंगभुषाकार, नेपथ्यकारांना नियमित सराव करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल, अशा सुचनाही आ. केळकर यांनी केल्या आहेत.

error: Content is protected !!