ठाणे :- ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील द्वितीय वर्ष एमबीबीएसची विद्यार्थिनी तन्वी मुळ्ये हिची अकराव्या वॉटरपोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड झाली आहे. शिबिरात निवड झालेल्या देशभरातील २५ खेळाडूंमधून ऑक्टोबर २०२५मध्ये होणाऱ्या वॉटरपोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवड करण्यात येणार आहे. तन्वी सध्या बंगलोर येथे या शिबिरात सहभागी झालेली असून हे शिबीर महिनाभराचे आहे.
तन्वी वॉटरपोलो या क्रीडा प्रकारात पारंगत असून तिने २०१९ पासून विविध कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात राष्ट्रस्तरीय खेळांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. सन २०२३ मध्ये भुवनेश्वर झालेल्या वीस वर्षाखालील वयोगटात, आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो प्रशिक्षण शिबिरातही तिला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती.
पालकांच्या प्रोत्साहनामुळे लहानपणापासूनच तिने वॉटरपोलो खेळाची आवड जोपासली. त्याचबरोबर, अभ्यासाशी सांगड घालून तिने शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात नीट (NEET) परीक्षा देऊन प्रवेश मिळवला. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांनीही एमबीबीएसचा अतिशय कठीण अभ्यासक्रम सांभाळत, वॉटरपोलोचा सराव चालू ठेवण्यास तिला प्रोत्साहन दिले.
आंतराराष्ट्रीय स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची निवड झाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचे महाविद्यालयाचे डीन राकेश बारोट यांनी नमूद केले. तसेच, शिबीर यशस्वीपणे पूर्ण करून संघात निवड व्हावी यासाठी तन्वीला शुभेच्छाही दिल्या आहेत.