गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
ठाणे: नाशिकच्या मिनाताई ठाकरे सिंथेटिक ग्राउंड येथे २६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय थलॅटिक स्पर्धेतील लांब उडीमध्ये ठाण्याच्या अदा पठाण हिने सुवर्ण कामगिरी केली आहे. ही कामगिरी अदा हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात केली असून तिची निवड नोव्हेंबरमध्ये आसाम, गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय लांब उडी स्पर्धेसाठी झाली आहे.
अदा वतन पठाण ही ठाणे येथील वसंत विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. तिने ठाणे जिल्हास्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यातून तिची नाशिक येथे २६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेत निवड झाली होती. या लांब उडी स्पर्धेतील १४ वर्षाखालील गटात अदा पठाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, यासह विविध जिल्ह्यातील ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत प्राप्ती प्रकाश शेट्टी (मुंबई) हिने द्वितीय तर दिशा प्रमोद देवगिरी (नाशिक) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
राष्ट्रीय लांब उडी स्पर्धेसाठी अदा हिची निवड झाली असून ही स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आसाम राज्यातील गुवाहाटी येथे होणार आहे. या स्पर्धेस जाण्यासाठी शाळेने अदा पठाण हिची विमान प्रवासाची व्यवस्था केली आहे.
अदा पठाण ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेल्या एक महिन्यापासून दररोज दोन तास सराव करीत होती. तिला प्रशिक्षक सुनील होनमाने, संदीप चाछर, सचिन गावडे, विकास राजभर यांचे मार्गदर्शन तर आई डॉ. परवीन पठाण, वडिल वतन पठाण यांचे प्रोत्साहन लाभले.