ठाणे: बील मंजूर करण्याकरिता दोन टक्क्यांप्रमाणे 20 हजार रुपयांची मागणी करत, 17 हजार 500 रुपयांची रक्कम स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) मंगळवारी दुपारी मुरबाड पंचायत समितीचे ग्रामसेवक यासिन इस्माईल शेख (52) यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.
तक्रारदारांना नवीन इमारत बांधकाम टेंडर मंजूर झालेले असून, त्या कामाचे बील सुमारे 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील अर्ध्या बांधकामाची रक्कम 10 लाख रुपये यापूर्वी अदा करण्यात आलेली होती. तर उर्वरीत 09 लाख 24 हजार 595 या रक्कमेचे बिल मंजूर करण्याकरीता यासिन शेख यांनी त्यांच्याकडे 02 टक्के प्रमाणे म्हणजे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. 17 हजार 500 रुपये देण्याचे ठरले होते. याचदरम्यान तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी 11 जून 2024 रोजी ठाणे एसीबी पथकाने पडताळणी केली. यामध्ये शेख यांनी लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच एसीबीच्या ठाणे युनिटने सापळा लावून 17 हजार 500 रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. अशी माहिती ठाणे एसीबीने दिली.