Homeठाणे-मेट्रोलाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार ठाणे एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार ठाणे एसीबीच्या जाळ्यात

ठाणे: ॲल्युमिनियम पटटया आणि टेम्पो असा पकडलेला ऐवज सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करत, 1 लाख 90 हजार रुपये स्वीकारताना कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माधव अर्जुन दराडे (49) यांना पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर रंगेहाथ पकडले. तर, दराडे यांना प्रोत्साहन देणारे कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार तानाजी पोतेकर (40) यांनाही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्या दोघांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.
तक्रारदारांचा नाशिक येथील वाडीवरे येथे अॅल्युमिनीयम पट्टी बनवण्याचा कारखाना आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीतील अॅल्युमिनीय पटटया हा माल मुंबई येथे विक्रीसाठी आयशर टेम्पोमधून पाठवला होता. पण, 16 एप्रिल 2024 रोजी तो टेम्पो मालासह कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्यामुळे तक्रारदार हे तो सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असताना, पोलीस हवालदार दराडे यांनी त्यांना तो माल आणि टेम्पो सोडविण्यासाठी स्वतःकरिता तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक पोतेकर व वरिष्ठ पोलीस निरिक्षक उतेकर यांना देण्याकरीता एकूण 02 लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे दिले नाहीतर माल आणि गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात सडत राहील अशी धमकी दिली. तसेच 24 एप्रिल 2024 रोजीपर्यंत 02 लाख रुपये घेवून येण्यास सांगितले. याचदरम्यान तक्रारदारांनी त्याच दिवशी ठाणे एसीबीत जाऊन तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 24 एप्रिल रोजी पडताळणी करताना पोलीस हवालदार दराडे यांनी तक्रारदारांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे आणि पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांनी दराडे यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच हवालदार दराडे यांना तक्रारदारांकडून पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर 01 लाख 90 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांना ताब्यात घेतले अशी माहिती ठाणे एसीबीने दिली. याप्रकरणी पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक राजेश जागडे करत आहेत.

error: Content is protected !!