ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे. आधीच सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम आणि पोलिसांचे फसलेले नियोजन यामुळेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रसंगी उमेश अग्रवाल म्हणाले, सूमीत नावाच्या कोणा बाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिव्हायडर टाकण्यात आले होते. त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरत होते. आता रस्त्यातील खड्डे आणि पोलिसांचे नियोजन फसत असल्याने ही कोंडी होत आहे. जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन केले नाही तर आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू, असा इशाराही उमेश अग्रवाल यांनी दिला.
तर, अभिजीत पवार यांनी, डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का? शहरातील रस्त्यांची कामे नागरिकांच्या हितासाठी नाहीत तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रूग्ण वाहतूक कोंडीत अडकून दगावतात ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यास सरकारच जबाबदार आहे, अशी टीका केली.
या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,आभिषेक पुसाळकर,श्रीकांत भोईर,संदीप वेताळ,कुणाल भोईर,समीर नेटके, विषांत गायकवाड,आशिष वाघ,मनीष शर्मा,दीपक वरटे,गणेश सूर्यराव आदी सहभागी झाले होते






