Homeसंपादकीयविकास… दिव्याच्या रेल्वे पटरीवर घसरून आपटला!असंच काहीसं उत्तर असेल...

विकास… दिव्याच्या रेल्वे पटरीवर घसरून आपटला!असंच काहीसं उत्तर असेल…

■ सुहास खंडागळे/सडेतोड

बुधवारी दिव्यात रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांचा संताप झाला.कामावर जाण्यास वेळ होत असतानाच लोकलने घोळ घातला.याचा फटका प्रवाशांना बसला.फलाट क्रमांक चार वर येणारी लोकल फलाट क्रमांक दोन वर आल्याने गोंधळ उडाला.या गोंधळात काही महिलांनी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला,संपूर्ण प्रकरण हाताळण्यात दहा ते पंधरा मिनिटे गेली.अखेर गोंधळ मिटला.कामावर जाण्यासाठी ज्या महिला जीवावर उदार होऊन लढल्या त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले.

स्वतःच्या कामावर वेळेत जाण्यासाठी सामान्य माणसाचा संघर्ष पोलीस कारवाईसाठी कारणीभूत ठरत असेल तर उपनगरीय रेल्वेचा विकास हरवलाय कुठे?असा प्रश्न निर्माण होतो.दिवा रेल्वे स्थानकात बुधवारी हा संपूर्ण प्रकार घडला. त्याला निमित्त ठरलं दिव्यात सकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना रेल्वेमध्ये चढायला मिळत नाही या कारणाचे!आता प्रवाशांना सकाळी कामाच्या वेळेस रेल्वे पकडता येत नसेल तर अशी लोकल रेल्वे दिवा स्थानकात थांबून त्याचा फायदा येथील प्रवाशांना काय? याचं उत्तर रेल्वे प्रशासनाने द्यायला हवे.

जानेवारी 2015 ला दिवा स्थानकात प्रवाशांचा मोठा उद्रेक झाला होता.जनतेने उत्स्फूर्तपणे रेलरोको केला होता. या रेल रोकोची चांगलीच धास्ती रेल्वे प्रशासनाने त्यावेळी घेतली होती.
दिवा रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकल मध्ये चढायला मिळत नाही.लोकलची संख्या वाढवावी,दिवा स्थानकातून स्वतंत्र लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यंत सोडावी अश्या प्रमुख मागण्या त्यावेळी येथील जनतेने केल्या…आजचा प्रकार काय सांगतो?येथील प्रवाशांना गर्दीच्या वेळी लोकल मध्ये चढण्यास न मिळाल्याने बुधवारची घटना घडली असे साधारणपणे म्हणता येईल.जी स्थिती जानेवारी 2015 ला होती त्यात फारसा काय फरक पडला?गर्दीच्या वेळी लोकांना लोकल मध्ये चढायला न मिळणे हा महत्त्वाचा प्रश्न तसाच आहे.यावर दिव्यातून स्वतंत्र लोकल सुरू करण्याचा विचार का होत नाही हा जनतेचा सवाल आहे.

रेल्वे स्टेशन सुधारणा,स्थानकात पायाभूत सुविधा,वाढीव तिकीट खिडकी,सरकते जिने,पादचारी पूल ही कामे झाली.ती व्हायलाच हवी होती..हा बदल नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.याबाबद्दल लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाला धन्यवाद द्यायला हवेत.मात्र रेल्वे स्टेशन वर लोकं फेरफटका मारायला येत नाहीत तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला येतात…आणि त्यांचा प्रवास सुखकर करणे हे रेल्वेचे प्रमुख कर्तव्य आहे असे आमचे मत आहे.

मागील काही वर्षांत दिवा स्थानकात गर्दीच्या वेळी येथील प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरळीत व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना झाल्या नाहीत हेही तितकेच वास्तव आहे.सकाळी जीव मुठीत घेऊन दिव्यातील जनतेला प्रवास करावा लागतो. कल्याणच्या दिशेने भरून येणाऱ्या लोकल मध्ये चढण्यास नागरिकांना संघर्ष करावा लागतो… स्टेशनचे सुशोभीकरण करण्या आधी येथून गर्दीच्या वेळी लोकल प्रशासनाने सोडली तर दिवावासीय रेल्वे प्रशासनाचे अधिक धन्यवाद मानतील,इतका त्रास येथील प्रवासी रोज सकाळी सोसत असतात.

ज्या पद्धतीने दिव्यातील लोकसंख्या वाढत आहे, ते पाहता दिवा जंक्शन वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या दरम्यान सकाळी गर्दीच्या वेळी गाड्या सोडल्यास प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल…अन्यथा कितीही स्टेशन रंगरंगोटी करून झगमगाट केला तरी दिव्यातील चाकरमानी वर्गाचा रोजचा संघर्ष संपणार नाही.

दिवा स्टेशनचा कोट्यवधी रुपये खर्च करून कायापालट केला आणि येथील प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी स्वतंत्र लोकल सुरू केली नाही…तशी पावलं रेल्वेने टाकली नाहीत आणि सकाळच्या गर्दीत लोकल मध्ये चढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या… संतापलेल्या रेल्वे प्रवाशाला विचारलं…विकास कुठं आहे?…तर मात्र, विकास…दिवा स्टेशनच्या पटरीवर घसरून आपटला…असंच काहीसं उत्तर तो प्रवासी देईल…!

error: Content is protected !!