Homeठाणे-मेट्रोविद्यार्थ्यांवरील गुन्ह्याप्रकरणी पोलिसांना किरीट सोमय्या, म्हस्केंनी विचारला जाब

विद्यार्थ्यांवरील गुन्ह्याप्रकरणी पोलिसांना किरीट सोमय्या, म्हस्केंनी विचारला जाब

नौपाडा पोलिसांकडून गुन्हा वर्ग करण्याचे पोलिस उपायुक्तांचे आश्वासन

ठाणे :- एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ग्राऊंड स्टाफ आदी पदांसाठी दरमहा ५० हजार रुपयांच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांवर गंभीर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या व शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठिय्या आंदोलन करीत नौपाडा पोलिसांना जाब विचारला. सुमारे चार तासांच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर नौपाडा पोलिसांकडून अन्य पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्याचे पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी आश्वासन दिले. त्याचबरोबर नौपाडा पोलिसांकडून विद्यार्थ्यांना दिलेल्या धमक्यांबाबत विद्यार्थ्यांचा जबाब घेण्याबरोबरच या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचेही आश्वासन दिले.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बनावट शिक्षण संस्था व बोगस प्लेसमेंट एजन्सी मोठ्या संख्येने आहेत. त्यातील नॅशविल एव्हिएशन संस्थेत २३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या बड्या नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना पीडीएफ कॉपी व वेगवेगळ्या प्रशिक्षकांमार्फत ९ महिने किरकोळ प्रशिक्षण दिल्यानंतर, १० ते १२ हजार रुपयांच्या लोडरच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे काही संतप्त विद्यार्थी व विद्यार्थींनींनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याठिकाणी पोलिसांनी कोणतीही तक्रार न घेता, विद्यार्थ्यांनाच पोलिस तक्रार केल्यास कोर्टात जावे लागेल, पासपोर्ट मिळणार नाही, असे सांगत घाबरवून सोडले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या कार्यालयात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संजय वाघुले, वृषाली वाघुले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र, या प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याऐवजी संस्थाचालक डॉ. प्रमोदकुमार मौर्या याने विद्यार्थी, पालक आणि भाजपा कार्यकर्ते अशा ३६ जणांविरोधात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनी त्याच दिवशी तक्रार दाखल करून विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांवरही गुन्हे दाखल केले. या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.
या प्रकरणाची दखल घेऊन भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या व खासदार नरेश म्हस्के यांनी काल सायंकाळी सहाच्या सुमारास नौपाडा पोलिस ठाण्याला भेट देऊन ठिय्या धरला. तसेच या प्रकरणाचा पोलिसांना जाब विचारला.अवघ्या १७ ते १८ वर्षांच्या मुलाविरोधात थेट गंभीर कलमांचा गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. तसेच पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्याकडे गुन्हा रद्द करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या धमक्यांबाबतही निषेध करण्यात आला.या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेबाबतही सवाल केला. अखेर या प्रकरणाचा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यातून इतर पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचे आश्वासन उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर नौपाडा पोलिसांबद्दल विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या उपायुक्त स्तरावर तक्रारी ऐकून जबाब नोंदविला जाईल. त्यानंतर महिनाभरात योग्य अहवाल करून कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्त बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले.

error: Content is protected !!