दिवा शहरातील बंधू आणि भगिनींनो,गेल्या पंधरा वर्षांपासून दिवा शहराला अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. रस्ते, गटारे, पाणी पुरवठा,या बाबत शहरात कामे झाली आहेत होत आहेत.आज जेव्हा आपण २०१२ च्या आधीचा दिवा आणि आत्ताचा दिवा पाहतो, तेव्हा हा बदल नक्कीच जाणवतो. एकेकाळी पाण्याची मोठी समस्या होती, पाणी वितरणासाठी पाईपलाईनची कमतरता होती आणि सरकारी निधी मिळण्यातही अडचणी येत होत्या. पण यावर मात करत, २०१२ ते २०१७ या काळात आम्ही स्वतःच्या खर्चाने अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकून लोकांना पाणीपुरवठा केला. अनेक भागातील रस्ते हे नागरिकांना जाण्यायेण्यासाठी नव्हते ते स्वखर्चाने करून दिले. वेळप्रसंगी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले.
२०१७ नंतर, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहराचा कायापालट सुरू झाला. विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने शहर बदलण्यास सुरवात झाली.आज शहरातील प्रमुख रस्ते आता काँक्रिटचे झाले आहेत. चिखलात असलेले अनेक रस्ते नव्याने बांधले गेले. आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याने दिवा रेल्वे स्टेशनची सुधारणा याच काळात झाली आणि आज ते एक उत्तम रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथून फास्ट लोकल सुरू झाल्या आहेत. लवकरच दिवा लोकल सेवा देखील सुरू होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
दिवा शिळ रोड चे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग प्लाझाचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा पालिकेकडे आग्रह आहे.तसेच, दिवा-आगासन हा मुख्य रस्ता झाल्याने रहदारी अधिक सोयीची झाली आहे. अनेक अंतर्गत रस्ते काँक्रिटचे झाल्याने वस्त्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजही काही ठिकाणी कच्चे रस्ते आहेत, पण ते लवकरच मार्गी लागतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात हे आमचे ध्येय आहे. महापालिकेच्या माध्यमातून, दिवा शहरात प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी दवाखाने आणि आरोग्य केंद्रे सुरू झाली आहेत आणि लवकरच एक चांगले हॉस्पिटलही उपलब्ध होईल.पाण्याची समस्या कायमची संपवण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत आणि लवकरच संपूर्ण दिवा शहर पाणीटंचाईमुक्त होईल. दिवा शीळ पाईपलाईनसाठी गेली अनेक वर्ष मी स्वतः पाठपुरावा करत होतो, त्या पाईपलाईनचे काम आज सुरू आहे.
याशिवाय, नागरिकांना उत्तम दर्जाचे नाट्यगृह, तसेच ठाण्याच्या धर्तीवर सुसज्ज भाजी आणि मासे मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिवा शहरातील ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क उपलब्ध होण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठीही आमची वाटचाल सुरू आहे, जेणेकरून दिवा शहराला उत्कृष्ट शिक्षणाची संधी मिळेल. शहरात उत्तम दर्जाचे फुटपाथ असावेत आणि फेरीवाल्यांची समस्या दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच, सामान्य नागरिकांच्या मनोरंजनासाठी एक चांगले थीम पार्क असावे यासाठी देखील आम्ही काम करत आहोत. आज दिवा शहरातून ठाणे, नवी मुंबईसाठी बसेस सुटतात. प्रवाशांच्या सोयीसाठी उत्तम दर्जाचा बस स्टॉप व्हावा यासाठी देखील मी स्वतः पाठपुरावा करत आहे.
गेल्या काही वर्षांत दिवा शहराचा झालेला विकास पाहून, येणाऱ्या काळात दिवा हे एक उत्तम दर्जाचे शहर बनेल असा विश्वास मी तुम्हाला देतो. आमचा हा पाठपुरावा असाच सुरू राहील.
– शैलेश मनोहर पाटील
माजी नगरसेवक
उपशहर प्रमुख, शिवसेना