दिवा:- शहरातील डीजी कॉम्प्लेक्स परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या जुन्या व्यायाम शाळेच्या जागेवर नवीन व्यायाम शाळा व अभ्यासिका बनवण्याची मागणी दिवा मनसेने केली आहे.
साबेगाव येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मला लागून महापालिकेची जुनी व्यायाम शाळा अस्तित्वात होती. परिसरातील अनेक तरुण या व्यायामशाळेचा वापर करायचे. पण कालांतराने ही व्यायाम शाळा जुनी झाल्याने धोकादायक झाली होती. अंदाजे दोन वर्षांपूर्वी धोकादायक अवस्थेत असलेली हि व्यायाम शाळा महापालिकेने जमीनदोस्त केली होती. सध्या याच ठिकाणी तिचे भग्नावस्थेत अवशेष दिसून येतात.
सदर ठिकाणी भविष्यात कुठलेही अतिक्रमण होऊ नये म्हणून महापालिकेने तिथे तारेचे कुंपण करून घ्यावे. तसेच सदर जागेवर पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या माध्यमातून व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नव्याने तयार करण्याची मागणी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांची भेट घेवून दिवा मनसेने केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव प्रशांत गावडे आणि विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते.