ठाणे :- हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला असताना गुरुवारीप्रमाणे शुक्रवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच अचानक दुपारी चार वाजण्याच्या नंतर वातावरण बदल होऊन जोराचा वादळी वारा सुरू झाला. याचदरम्यान शहरात धुळीचे साम्राज्य पसरलेच याशिवाय शहरातील नौपाडा, मानपाडा आणि पवारनगर या ०३ ठिकाणी झाडे आणि वागळे इस्टेट परिसरात एका ठिकाणी झाडांच्या फांदी तुटून पडली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून एका झाड पडल्याचा घटनेत तीन दुचाकींचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान जुन्या कळवा खाडी पुलावर विद्युत लाईटचा पोल ही मधोमध तुटून पडला आहे. याशिवाय ठाणे स्टेशन परिसरातील दिशादर्शक फलकही धोकादायक झाला होता.
बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार असून यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अशातच शुक्रवारी ठाणे शहरातील वातावरणात अचानक बदल घडून ढगाळ वातावरण झाले होते. त्यातच गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातवरण निर्माण झाले होते, अशातच सायंकाळी ४.०० वाजेच्या सुमारास वतावरणात अचानक बदल होवून वादळी वारा सुटला होता. अचाकनपणे आलेल्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या होत्या. तर, दुचाकी वाहन चालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावून आडोशाला उभे राहिल्याचे दिसून आले. तर, संपूर्ण वातवरणात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
तीन दुचाकी पडले झाड
नौपाडा परिसरात गांधर्वी इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या ३ दुचाकी गाड्यांवर झाड पडले. ते पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले असून त्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.
स्ट्रीट लाईट पोल
जुन्या कळवा खाडी पुलावरील स्ट्रीट लाईट पोल मधोमध तुटून फुटपाथ वरती पडला आहे. ही सव्वा चार वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. पडलेला पोल ठामपा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला केला.
धोकादायक फलक हटवला
ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरती असलेला दिशादर्शक फलक वाऱ्यामुळे धोकादायक झाला होता.
तो फलक ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढून बाजूला करण्यात आला आहे.