संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार पं. विश्वनाथ कान्हेरे यांना तर युवा पुरस्कार वेदश्री खाडिलकर-ओक यांना प्रदान
ठाणे : – काही शहरे ही माणसे मोठी करतात, तर काही माणसे शहर मोठे करतात. पं. राम मराठे यांनी आपल्या संगीताने ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या नावाने गेली २८ वर्षे सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी याप्रसंगी केले. तसेच, पुरस्कारप्राप्त दोन्ही कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी, पं. विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने तर वेदश्री खाडिलकर-ओक यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पं. राम मराठे या माझ्या गुरूजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे. तो मी कायम जपून ठेवीन, अशा भावना पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. तर, कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावर कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेने रसिकांना भरभरून आनंद देत असतो. मी ठाणेकर असून आजचा हा सन्मान घरचा असल्याने अधिक आनंद होत असल्याचे उद्गगार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री खाडिलकर-ओक यांनी काढले.
ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यास रंगमंचावर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, पं. अजय पोहनकर, पं. राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त पद्मश्री बैनाडे समिती सदस्य विवेक सोनार, रवी नवले आदी उपस्थित होते.
पं. राम मराठे यांच्याकडून शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीतातील अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. जोड राग कसा मांडावा हे मी त्यांच्याकडून शिकलो. पं. राम मराठे यांच्या ठाण्यातील नादब्रह्म बंगल्यात माझे वास्तव्य होते. त्यांच्या नावाने ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेला हा महोत्सव अत्यंत मानाचा असून या महोत्सवात आपली कला सादर करणा-या दिग्गज कलावंतांनी व रसिकांनी या महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या महोत्सवात मी देखील अनेक कलावंतांना हार्मोनियमची साथसंगत केली असल्याने या रंगमंचावर हा पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याचे पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी नमूद केले. तर, वेदश्री खाडिलकर-ओक यांनी आजवरच्या त्यांच्या प्रवासात साथ देणा-यांचा उल्लेख करीत ठाणे महानगरपालिकेने पुरस्कारासाठी कलेची निस्सीम सेवा करणाऱ्या कलाकारांची निवड त्यांच्या कर्तृत्वावर केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे. तर, युवा पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे.
शास्त्रीय संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी महापालिकेतर्फे पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संगीताची मुळे मातीत घट्ट रोवली जावीत हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी प्रास्ताविकात नमूद केले. तर, आभार प्रदर्शन उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी केले. तसेच, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.