आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन
प्रेरणा संस्था आयोजित बारावी सराव परीक्षेला दीड हजारहून अधिक विद्यार्थी
ठाणे: सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणिवा कळतात. त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले यश मिळते, असे मत आमदार संजय केळकर यांनी बारावी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केले.
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने सलग 13व्या वर्षी १२ वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ७ डिसेंबरपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री.केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढविण्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावण्यास आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
ही सराव परीक्षा ७, १४, २१ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येत आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळील महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्रे असून या परीक्षेत दीड हजारहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. सराव परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र वितरण समारंभ ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून, याप्रसंगी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
श्री.केळकर यांनी दोन्ही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. या उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, गेली 13 वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यात कोचिंग क्लास संघटनेचा देखील सहभाग असतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळत असल्याचे श्री.केळकर म्हणाले.






