ठाणे:- सिमेंट मिक्सर या वाहनामधून गोवा निर्मित परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या वाहतुकीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने उधळून लावला. या कारवाईत ५९५ बॉक्स आणि सिमेंट मिक्सर असा ६६ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मोहन शंकरजी जोशी नामक या वाहनचालकाला अटक केली. ही कारवाई नवीमुंबई बेलापूर येथे मंगळवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार ठाणे भरारी पथक नवीमुंबई, बेलापूर सीबीडी – डी. वाय. पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना संशयित दहाचाकी सिमेंट मिक्सर या वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाण्याचे निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर.महाले,
एस. आर. मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक बी.जी. थोरात, जवान आर.बी. खेमनर,आर.एस. पाटील, पी.ए. महाजन, पी.एस. नागरे, एस.एस. यादव ,एम.जी.शेख या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक प्रविण तांबे
यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाण्याचे निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी हे करीत आहेत.