ठाणे :वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी २२ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ठाणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी टी निपुर्ते यांनी दिली.
वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२३-२४ ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात ०५ एप्रिल २०२३ रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्यस्तरावरुन पूर्ण करण्यात आली असून या लॉटरी निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १० हजार ९९६ अर्जांची निवड झाली असून अद्यापपर्यंत केवळ ६ हजार ८७७ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी २२ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पालकांनी प्रवेश पत्र तसेच हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका/ महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून २२ मे २०२३ पर्यंतच आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. असे ही म्हटले आहे.






