Homeशहर परिसरदिवा येथील शाळांमध्ये पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवली जात असल्यावरून मनसे...

दिवा येथील शाळांमध्ये पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवली जात असल्यावरून मनसे आक्रमक; शिक्षण विभागाकडून कारवाईचे आश्वासन

दिवा : हिंदी सक्तीचा आदेश रद्द असतानाही दिवा येथील काही शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे सुरू असलेल्याचे निदर्शनास आणत मनसेने यास तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाने यापूर्वी रद्द केलेला आदेश असतानाही हिंदी भाषेची सक्ती सुरू असल्याने, मनसेने शिक्षण विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने बुधवारी यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी लेखी तक्रार केली. पालकांनी दिवा मनसेकडे केलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचा निर्णय मनसेच्या विरोधामुळे रद्दबातल ठरवला होता. असे असतानाही दिव्यातील काही शाळांमध्ये आजही हिंदी भाषा शिकवली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या भेटीदरम्यान, अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना अशा शाळांवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच, ठाणे शहरातील सर्व शाळांना याबाबतचे स्पष्ट लेखी आदेश शिक्षण विभागाने तात्काळ जारी करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
शिक्षण अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, पुढील २४ तासांत या संदर्भात सर्व संबंधित शाळांना स्पष्ट आदेश काढले जातील.
यावेळी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर सचिव प्रशांत गावडे, उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, शरद पाटील, किरण दळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!