दिवा :– ठाण्यावरून वरून येणाऱ्या एसी लोकलवर एक अज्ञात व्यक्ती चढल्याने मोठी दुर्घटना घडली. पंचवीस हजार वोल्टच्या उच्चदाब विद्युत तारेचा धक्का लागून तो गंभीररीत्या भाजला. ही घटना दिवा रेल्वे स्टेशनवर घडली.
घटनास्थळी उपस्थित रेल्वे कर्मचारी शरद आलिमकर, देवेश पाटील, प्रदीप मोरे सफाई कामगार मुकादम आणि हमाल बिरबल, रेल्वे लोहमार्ग पोलिस नंदकिशोर राऊत, प्रदीप पवार यांनी तातडीने धाव घेत, त्या व्यक्तीस खाली उतरवले. त्यांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले.
जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे दिवा स्टेशन परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना जीव धोक्यात घालून अशा प्रकारे छतावर प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.