दिवा:- दिवा शहरातील वैभव ढाबा ते साबे गाव स्मशान भूमी रस्त्याचे काम गेली दोन वर्षे मंजूर असूनही, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या गंभीर दिरंगाईबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही टीका करत, रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता दोन वर्षांपासून केवळ कागदावरच मंजूर राहिला आहे. कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात शहरप्रमुख सचिन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “सदर रस्त्याचे त्वरीत काम सुरू करा, अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर आंदोलन करनार.”
प्रशासनाने या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन, दिवा ते साबे गाव स्मशान भूमी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली दिवा शहरात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.






