दिवा:- आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात भारतीय जनता पक्षाने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लक्ष्य केले आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी, ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेषतः दिवा शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. दिवा भाजपने नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्ध राजकीय युद्ध पुकारले असून, महापालिका निवडणुकीत युतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुमारास दिवा शहरात करण्यात आलेल्या इमारतींवरील कारवाईच्या अनुषंगाने दिवा भाजपने बॅनर लावत शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना ‘काळी दिवाळी’ असा उल्लेख केला आहे. या कारवाईवेळी सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपने लक्ष्य करत त्यांची फटकार लगावली आहे. हा हल्लाबोल निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला अडचणीत आणणारा ठरत आहे.
दिव्यात जुनाच संघर्ष:-
ठाणे शहराचे भाजप नेतृत्व असो वा दिवा शहराचे, ते पूर्वीपासूनच शिवसेना (सध्या शिंदे गट) यांच्या विरोधात राहिले आहे. भाजपने मागील काही वर्षांत दिव्यात केलेली आंदोलने ही नेहमीच सत्तेतील शिवसेनेविरुद्ध राहिली आहेत. शिवसेना एकसंध असतानाही ठाण्यावर शिंदे यांचेच वर्चस्व होते आणि पक्षफुटीनंतर बहुसंख्य नगरसेवक त्यांच्याकडेच राहिले, ज्यामुळे आजही ठाण्यावर एकनाथ शिंदे यांचेच एकछत्री वर्चस्व आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांच्या शिवसेनेवर थेट हल्लाबोल सुरू केला आहे.
दिव्यातील स्थानिक नेतृत्वाचे राजकीय ‘टार्गेट’ सेट:
वरिष्ठ स्तरावर महायुती होईल अशी चर्चा असली तरी, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाणे शहर आणि दिवा शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली राजकीय ‘टार्गेट’ शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धच निश्चित केले आहेत. बॅनरबाजीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘शिंदेंच्या शिवसेने विरोधातच लढायचे आहे’, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
दिव्यातील समस्यांवरून सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज:
दिवा भाजपने नेहमीच दिव्यातील पाणी प्रश्न, फेरीवाले समस्या, डम्पिंग आणि आरोग्य प्रश्न अशा विविध समस्यांवरून महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या दिव्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांना जबाबदार धरले आहे आणि याविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. एकंदरीत, निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपली लढाई शिवसेना शिंदे गटाविरुद्ध असल्याचे या बॅनरबाजी आणि आक्रमक पवित्र्यातून स्पष्ट केले आहे.
या स्थानिक पातळीवरील आक्रमकतेमुळे, आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात जागावाटप आणि युतीचे समीकरण जुळणार की, दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.






