ठाणे :- ठाणे काँग्रेसने काही दिवसापूर्वी ठाणे महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे (पत्र) नाचवुन खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसुन शिक्षण विभागाच्या या दुर्लक्ष्या विरोधात काँग्रेसने बुधवारी पुन्हा आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी, शिक्षण विभागाच्या आधिकाऱ्याना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळाच्या इमारतींची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले होते. परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण विभागाकडे केवळ एकच पर्यवेक्षक असल्याने व या पूर्वीच्या शिक्षण उपायुक्तांनी भरारी पथक नेमण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची तसेच अन्य आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने खाजगी शाळांवर नियंत्रणच ठेवता येणार नाही. असे असताना शिक्षण मंडळाने दिखाव्यापुरते पत्र देऊन आपले हात झटकल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा, शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागल्याचे यावेळी सांगितले.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, अर्थतज्ञ विश्वास उटगी,प्रदेश सचिव मधु मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनावेळी वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शालेय शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा न मिळणे, शिक्षकांची रिक्त पदे यासह इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे,रविंद कोळी, स्मिता वैती,निशिकांत कोळी,राजू शेट्टी,जावेद शेख,अंजनी सिंग,सुरेश भोईर,अब्बास भाई,श्रीरंग पंडित,निलेश पाटील,आनंद सांगळे,शीतल अहेर,शांती एलावडेकर,संगीता कोटल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.






