दिवा:- दिवा विभागातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI – आठवले गट) ची ताकद आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवा विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले नेतृत्व, अजित एकनाथ भगत यांनी रिपाइं (आठवले गट) मध्ये अधिकृत प्रवेश केल्याने दिवा शहरात पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.
अजित भगत हे तळागाळातील लोकांशी थेट संपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या अनेक समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. भगत यांच्या रूपाने पक्षाला एक जमिनीशी जोडलेले नेतृत्व मिळाल्याचे बोलले जात आहे.
दिवा शहरात दिनेश पाटील आणि आता अजित भगत यांच्यासारखे ओबीसी समाजाचे मोठे चेहरे रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना सौरव आढांगळे म्हणाले की, “दिनेश पाटील व अजित भगत हे ओबीसी समाजाचे मोठे चेहरे असल्याने, त्यांच्या नेतृत्वाचा फायदा नक्कीच रिपब्लिकन पक्षाला होणार आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद निश्चितच वाढेल.”
केवळ अजित भगतच नव्हे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरातील शेकडो कार्यकर्ते लवकरच रिपाइं मध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी दिवा शहरात एका भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






