दिवा:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने आणि शिवसैनिकांच्या अलोट गर्दीने दिव्यात शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या मिरवणुकीत शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, मोठ्या संख्येने महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेऊन निघालेल्या या रॅलीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. याप्रसंगी बोलताना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “दिव्याची जनता शिवसेनेच्या विकासाच्या व्हिजनवर पूर्ण विश्वास ठेवते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिव्यात केलेल्या विकासकामांची पावती म्हणून येथील जनता पुन्हा एकदा भगव्यालाच कौल देईल. शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि दिव्याचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील.”
या सोहळ्याला शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व एकवटलेले पाहायला मिळाले. यावेळी उपशहर प्रमुख शैलेश पाटील, आदेश भगत, अमर पाटील, दिपाली भगत, भालचंद्र भगत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यातील विकासकामांचे सातत्य राखण्यासाठी आणि स्थानिक समस्या मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या भव्य प्रतिसादामुळे शिवसेना आता पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.






