दिवा:ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिवा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावेळी प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेने एका उच्चशिक्षित आणि तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. साक्षी रमाकांत मढवी या केवळ २५ वर्षांच्या असून, संपूर्ण दिवा शहरातून निवडणूक लढवणाऱ्या त्या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
वडिलांचा वारसा आणि सामाजिक कार्याची जोड:
साक्षी मढवी या उच्चशिक्षित असून त्यांनी गेल्या काही वर्षांत आपले वडील रमाकांत मढवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विशेषतः महिला विकास व सबलीकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक उपक्रम आणि आरोग्य शिबिरे राबवण्यात त्या आघाडीवर राहिल्या आहेत. यामुळेच तरुण वर्ग आणि महिलांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
घरोघरी प्रचारावर भर:
साक्षी मढवी यांनी प्रभाग क्रमांक २८ मध्ये ‘डोअर-टू-डोअर’ प्रचारावर भर दिला आहे. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांनी प्रभागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना जनतेसमोर मांडल्या आहेत. त्यांच्या या संयमी आणि अभ्यासू वृत्तीमुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा दिवा शहर परिसरात रंगली आहे.
दिव्याला मिळणार नवा चेहरा?
दिवा प्रभाग समितीतून यावेळी एकूण ११ नगरसेवक निवडून जाणार आहेत. यामध्ये सर्वात तरुण चेहरा म्हणून साक्षी मढवी यांचे नाव चर्चेत आहे. “तरुण आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असणारा एक अभ्यासू प्रतिनिधी यंदा ठाणे महापालिकेत दिसेल,” असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
“शिक्षण आणि समाजकारणाची जोड घेऊन मी लोकांच्या सेवेसाठी मैदानात उतरले आहे. पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
— साक्षी रमाकांत मढवी (उमेदवार, प्रभाग 28 शिवसेना)






