दिवा: दिवा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला पाण्याचा खेळखंडोबा आणि ‘पाणी माफियांची’ मुजोरी आता चव्हाट्यावर आली आहे. दिवा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर ठिकठिकाणी अनधिकृत छिद्रे पाडून पाणी चोरी केली जात असल्याने सामान्य नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरसेविका स्नेहा अमर पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांची भेट घेऊन अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यासह दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा गावाला पाणी पुरवठा करणारी १२ इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी दिवा पूर्व रेल्वे लाईनला समांतर गेली आहे. या वाहिनीवर रेशनिंग दुकान ते रेल्वे कलवर्ट दरम्यान काही पाणी माफियांनी बेकायदेशीररीत्या डल्ला मारला असून, अनेक अनधिकृत नळ जोडण्या केल्या आहेत. ही चोरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की, त्यामुळे मुख्य जलवाहिनीचा दाब पूर्णतः कमी झाला असून दिवा गावातील बहुतांश भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक गृहसंकुले आणि चाळींमध्ये पाणी अजिबात पोहोचत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केवळ दिवा गावच नव्हे, तर दिवा पश्चिमेकडील इतर परिसरातही याच पाणी चोरीमुळे अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात नगरसेविका स्नेहा पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्पष्ट केले की, रेल्वे लाईनला समांतर असलेल्या या चोरीच्या जोडण्यांमुळे गावातील सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे पाणी पळवले जात आहे. प्रशासनाने तात्काळ मोहीम हाती घेऊन या अवैध जोडण्या कापून टाकाव्यात आणि ज्यांनी ही चोरी केली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून दिवा पश्चिमेकडील आणि गावातील पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकेल. या मागणीनंतर आता पाणी पुरवठा विभाग आणि प्रभाग समिती या पाणी माफियांच्या मुसक्या आवळणार का, याकडे संपूर्ण दिवावासीयांचे लक्ष लागले आहे.






