कोकणवासीयांना मोठा दिलासा; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी
ठाणे : सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे, रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होणार असून, रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सावंतवाडी रोड स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१ / १२२०२) तसेच अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. कोकणातील वाढती प्रवासी संख्या, पर्यटन, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या प्रवासाचा सविस्तर उल्लेख करत त्यांनी ही मागणी तातडीने मान्य करण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. रेल्वे मंत्रालयाने या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत अखेर या थांब्याला मंजुरी दिली.
वेळ आणि पैशांची होणार बचत
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण तसेच परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत या गाड्यांसाठी प्रवाशांना कणकवली किंवा इतर दूरच्या स्थानकांवर जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि अतिरिक्त प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता सावंतवाडी रोड स्थानकावरच या गाड्या उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना
या निर्णयाचा सर्वाधिक लाभ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच देशातील विविध भागांत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला प्रवाशांना, रुग्णांना तसेच दिव्यांगांना होणार आहे. याशिवाय कोकणातील पर्यटनालाही यामुळे मोठी चालना मिळेल. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग गाठणे अधिक सुलभ होणार असून, स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटन उद्योगाला या निर्णयाचा सकारात्मक फायदा होईल.
या ऐतिहासिक निर्णयामुळे कोकणातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले असून, प्रवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.






