दिवा:- ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई कामांमध्ये झालेल्या गंभीर त्रुटींबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संपूर्ण ठाणे शहरातील विविध प्रभागांतील ठेकेदारांवर सुमारे ₹२८.36 लाखांचा दंड आकारण्यात आला असून, त्यामध्ये दिवा विभागातील ठेकेदारावर तब्बल ₹७.३५ लाखांचा सर्वाधिक दंड आकारण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून दिवा विभागातील प्रशासनाचे अपयश आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे ज्वलंत उदाहरण आहे असे मुंडे यांनी म्हटले आहे.
दिवा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्षात कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे या दंडावरून स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली ही स्वागतार्ह बाब असली, तरी केवळ दंड आकारून जबाबदारी संपत नाही. अशा निकृष्ट कामांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, अभियंते आणि कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
दिवा विभागाचा सर्वाधिक दंड हा या भागातील नागरिकांवर झालेल्या अन्यायाचा पुरावा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी माझी ठाम मागणी आहे.
दिवा येथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू आणि आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनही करू.असे ॲड. रोहिदास मुंडे
उपजिल्हाप्रमुख, कल्याण ग्रामीण विधानसभा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी म्हटले आहे.






