ठाणे : ब्रह्मांड परिसरातील आझादनगर येथील मद्रास चाळीत शुक्रवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आई आणि लहान भाऊ जखमी झाले. जुन्या चाळीच्या गॅलरीचा भाग शेजारील घरावर कोसळल्याने ही घटना घडली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास मिशनरी चॅपल चर्चजवळील सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या तळ अधिक एक मजली मद्रास चाळीच्या गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी शेजारील घरात उर्मिला जयस्वाल (३५), त्यांचा मुलगा जयकुमार (१२) आणि विनित (९) झोपलेले होते. गॅलरीचा मलबा घरावर पडल्याने तिघेही त्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कापूरबावडी पोलिस आणि आपत्ती प्रतिसाद पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. तिघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या जयकुमारला ठाणे सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्मिला आणि विनित यांच्यावर मानपाडा येथील टायटन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे.
दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मद्रास चाळीतील तीन घरे तातडीने रिकामी करण्यात आली. परिसराला धोकापट्टी लावण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, माजीवाडा प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागाकडून इमारतीची पाहणी व पुढील कार्यवाही सुरू आहे. पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न या दुर्घटनेनिमित्त पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






