Homeठाणे-मेट्रोइमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये पडून चिमुरडीचा मृत्यू ; मुंब्र्यातील घटना

इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये पडून चिमुरडीचा मृत्यू ; मुंब्र्यातील घटना

तरुण ताब्यात

ठाणे: – मुंब्रा,सम्राट नगर येथील श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग या इमारतीच्या आतील बाजूस असलेल्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये पडून एका १० वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास समोर आला आहे. त्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून वैद्यकीय अहवालानंतर ते स्पष्ट होईल. असे पोलिसांनी सांगितले. पण, आरिफ अकबर मंसुरी या १९ वर्षीय तरुणाने तिला खेळणी देण्याचा बहाणा करून त्या इमारतीत आणल्याची कबुली दिली असून त्याला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोनवरून मुंब्रा,सम्राट नगर येथील श्रद्धा प्राप्ती बिल्डिंग या इमारतीच्या आतील बाजूस असलेल्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये कोणी तरी पडले अशी माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्ट मध्ये पडलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. तसेच सदर मृतदेह पुढील कार्यवाही करिता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहे. मृत चिमुरडी ही मुंब्र्यातील ठाकुरपाडा येथील मुंब्रादेवी अपार्टमेंट मध्ये राहणारी आहे.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याचदरम्यान पोलिसांनी आरिफ याला ताब्यात घेतले आहे. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

error: Content is protected !!