दिवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र
दिवा:-कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले आहे. यामुळे कल्याण लोकसभेत भाजपा उमेदवार उतरवणार का?असा प्रश्न आता मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
दिवा भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कल्याण लोकसभेचा मतदार संघ हा भाजपसाठी पोषक वातावरण असलेला मतदार संघ आहे.या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या व नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन,त्याच बरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी अशी आग्रही मागणी या पत्रात दिवा शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावेळी 400 पार आकडा गाठण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपच्या कमळ चिन्हावर लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याने आता शिवसेना शिंदे गटात याच्या काय प्रतिक्रिया उमटतात याकडे जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिलेले सदर पत्र दिवा शहर भाजपचे अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी यांनी दिले आहे. या पत्रावर भाजप पदाधिकारी अशोक पाटील, विनोद भगत, विजय भोईर, नरेश पवार ,समीर चव्हाण, रोशन भगत,गणेश भगत, सतीश केळशीकर ,युवराज यादव आदींच्या सह्या आहेत.