ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील शवविच्छेदनाची वेळ किमान रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगावकर यांच्याकडे केली आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील शवविच्छेदनाचे काम सद्यस्थितीत संबंधित प्राध्यापकांकडून कार्यालयीन वेळेतच केले जाते. डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध होताच २४ तास शवविच्छेदनाचे सुविधा सुरु करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपआयुक्त उमेश बिरारी यांनी दिली होती. प्रत्यक्षात अद्यापही शवविच्छेदन २४ तास सुरु झालेले नाही. शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार आदी आदिवासी दुर्गम तालुक्यातून रुग्णांचे नातेवाईक येत असतात. कार्यालयीन वेळेनंतर शवविच्छेदन होत नसल्याने तसेच रहाण्याची व्यवस्था नसल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसरातच रात्रभर थांबावे लागते, अशी स्थिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी स्पष्ट केली.
यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली.छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथे २४ तास शवविच्छेदनाचे सुविधा सुरु होईपर्यंत शवविच्छेदनाची वेळ किमान रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची अडचण काही प्रमाणात दूर होवू शकेल, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांना दिले. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन डाॅ. अनिरुद्ध माळगावकर यांनी माजी नगरसेवक उमेश पाटील यांना दिले आहे. यावेळी शाखाप्रमुख महेश गवारी, शाखाप्रमुख निनाद बोऱ्हाडे, युवासेना पदाधिकारी जय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.