ठाणे : विद्यार्थी दशेतील मुलांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी शासनामार्फत जनजागृती केली जात आहे. त्याच जनजागृतीचे फलित ठाणे जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहेत. तब्बल 936 ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांनी तंबाखू मुक्तीचे धडे गिरवल्याचे आता स्पष्टपणे दिसत आहे. तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून राबवला जात असून ठाणे सिव्हील रुग्णालय, सलाम मुंबई फाऊंडेशन आदींचे सहकार्य लाभले आहे.
शाळांच्या जवळपासच्या परिसरात तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असताना, काही ठिकाणी पानटपरीवर विडी, सिगारेट, गुटखा, ई सिगारेट विकली जाते. ठाणे जिल्ह्यात विद्यार्थी तंबाखू सेवनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य प्रशासन, ठाणे सिव्हील रुग्णालय, सलाम मुंबई फाऊंडेशनसह १७४ तंबाखू मुक्त आरोग्य संस्था यांच्या मार्फत तंबाखू मुक्त शाळा अभियान ठाणे जिल्ह्यात राबवले जात आहे. यासाठी शाळांमध्ये जाऊन जनजागृती शिबिर, पोस्टर द्वारे विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती दिली जात आहे. ठाणे जिल्हापरिषदेच्या तीन हजार १५३ शाळांपैकी ९३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. तसेच २०१७ पासून सुरू झालेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियानात काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शाळेत साधारण पाच फूट उंचीचे तंबाखू जनजागृतीचे फलक लावणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारापासून १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळेत तंबाखू जन्य पदार्थ किंवा त्या संदर्भात काही आढळणार नाही. शाळेची तंबाखू मुक्त समिती असावी यात विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी समावेश असावा. शैक्षणिक संस्थेत किमान सहा महिन्यातून एकदा तंबाखू नियत्रंण आधारावर कार्यक्रम आखणे महत्वाचे आहे. सर्व निकष शाळेने पूर्ण केल्यावर ही माहिती सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर पाठवायची असते.
” ठाणे सिव्हील रुग्णालयाच्या माध्यमातून २०२३-२४ या वर्षात दहा हजार ३०३ व्यक्तींची मौखिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम यावर समुपदेशन केलं असता १२० व्यक्तींनी तंबाखू सोडला आहे. तर ठाणे जिल्हापरिषदेच्या तीन हजार १५३ शाळांपैकी ९३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. “- डॉ. अर्चना पवार ,दंत शल्य चिकित्सक ,ठाणे.
” तंबाखू शाळा मुक्तीच्या उपक्रमात शिक्षण विभागाचा खूप मोठा वाटा आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा खाऊन थुकणे गैर मार्गाने तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करणे यांवर पाळत ठेवून, २०१७ पासून आत्तापर्यंत जिल्ह्यात १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.” – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हील रुग्णालय,ठाणे.