Homeठाणे-मेट्रोजिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

ठाणे : – शिक्षकदिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६” वितरण सोहळा ठाणे येथील बी. जे. हायस्कूल सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी एकूण सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

“जिल्हा परिषद ठाणे शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील निपुण महाराष्ट्र संकल्पना साकार होत असून, जिल्ह्यातील ३२ लाख विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासता येते. शिक्षकांच्या बदली, पदोन्नती व विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील प्रशासन वचनबद्ध आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधा, सौर ऊर्जा, डिजिटल शिक्षण व दुरुस्ती यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शिक्षकांना समृद्ध केल्याशिवाय विद्यार्थी सक्षम होणार नाहीत, त्यामुळे शिक्षकांचे योगदानच ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे खरे बळ आहे.” असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना म्हटले, “ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषदेचे कामकाज उत्तम सुरू आहे. आयुष्यभराच्या कर्तृत्वाचे फलित म्हणून आज शिक्षकांना हा सन्मान मिळत आहे, ही गौरवास्पद बाब आहे.”

आमदार निरंजन डावखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “शिक्षक हे खरे कर्मयोगी आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कार देण्याचे कार्य शिक्षक करतात, हे लाख मोलाचे आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्र गतिमान झाले आहे आणि यामध्ये शिक्षकांचा वाटा अमूल्य आहे.”

प्रास्ताविक करताना बाळासाहेब राक्षे यांनी शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षिका वर्षा भानुशाली यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडविण्यात आम्हाला सन्मानाने योगदान देता येत आहे. आजचा सन्मान म्हणजे शिक्षकांना मिळालेली कौतुकाची थाप आहे.”

यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब मोहिते, सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिकारी-कर्मचारी व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाराम ढमके यांनी केले तर विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव यांनी आभार मानले.

जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक

सन २०२५-२६ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील शिक्षिका वर्षा भानुशाली , भिवंडी तालुक्यातील पदवीदर शिक्षिका पुष्पावती भोईर, कल्याण तालुक्यातील शिक्षक राजाराम वेखंडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अविनाश सुरोशे व शिक्षक राजाराम गायकर, शहापूर तालुक्यातील शिक्षक नवनीत फर्डे

error: Content is protected !!