Homeठाणे-मेट्रोठाणे महापालिका निवडणूक: 'विकासाचा दिवा विझलाय'; वंचित बहुजन आघाडीचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

ठाणे महापालिका निवडणूक: ‘विकासाचा दिवा विझलाय’; वंचित बहुजन आघाडीचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

दिवा:ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवा प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचितचे उमेदवार विकास इंगळे आणि गाथा इंगळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिवा परिसरातील भीषण समस्या मांडत, “आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त मतांचे राजकारण केले, पण दिव्यातील सामान्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले,” असा थेट आरोप केला.
पत्रकार परिषदेत बोलताना विकास इंगळे म्हणाले की, “दिव्यात नवीन जलवाहिन्या टाकूनही समान पाणीवाटप होत नाही. अनेक भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणी येते. पावसाळ्यात तर ड्रेनेज लाईन जाम होऊन सांडपाणी रस्त्यावर येते, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर गाथा इंगळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सतत खड्डे पडत आहेत. पदपथ नसल्यामुळे शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रभागात पुरेशा मनपा दवाखान्यांचा अभाव असल्याने गरिबांना खाजगी रुग्णालयांचा महागडा खर्च परवडत नाही. कचरा उचलण्याची यंत्रणा कोलमडली असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे डास आणि दुर्गंधी वाढून साथीचे आजार पसरत असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि सुरक्षिततेचा प्रश्न
वंचितच्या उमेदवारांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. “टेंडरमध्ये भ्रष्टाचार होत असून अपूर्ण कामांची बिले पास केली जात आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये (SC/ST/OBC) निधी असूनही कामे केली जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पथदिवे नसल्याने महिला असुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या आणि मुद्दे:
शिक्षण: मनपा शाळांची दुरवस्था थांबवून डिजिटल सुविधा पुरवाव्यात.
पुनर्वसन: रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावून पात्र कुटुंबांना घरे द्यावीत.
युवा रोजगार: तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत.
“दिव्यातील जनता आता जागृत झाली आहे. विकासाच्या नावाखाली विस्थापन आणि कागदावरच्या योजनांना लोक कंटाळले आहेत. या निवडणुकीत आम्ही जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढू,” असा निर्धार विकास आणि गाथा इंगळे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!