ठाणे : – जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. पण, त्या कार्यक्रमाच्या पुढे जाऊन ठाणे शहर पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेऊन आयुक्तालयातील गरोदर महिलांना मायेची उब देण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी ठाणे पोलीस आयुक्तालयातील ज्या महिला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन महिला कर्मचारी या सात महिने व त्या वरील गरोदर आहेत अशा १९ महिला कर्मचाऱ्यांचे डोहाळे जेवण केले. तसेच यावेळी गरोदर महिलांना गरोदर काळात घ्यावयाची काळजी, महिलांना फॉलिक ऍसिडच्या गोळयाचे मोफत वाटप व गरोदर महिलांना साडयाचे वाटप करून ओटीही भरण्यात आली.
ठाणे शहर पोलीस हॉस्पीटल व जगन्नाथ म्हाप्रलकर विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्याकमाचे आयोजन विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना, ठाणे पोलीस हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव वाघमारे, ठाणे वेल्फेअर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, स्त्रीरोगतज्ञ डॉ. फडणवीस
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हॉस्पीटलचे कर्मचारी कुशल सुखदरे, ब्रदर (नर्स), कक्षसेविका पूजा पवार , फार्मासिस्ट शितल नानकर, महिला पोलीस अंमलदार रिया उत्तेकर व वेल्फेअर कक्ष, ठाणे शहरचे कर्मचारी पोलीस हवालदार माळवे, मठकर, खैरनार यांनी केल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.