Homeठाणे-मेट्रोठाण्यात नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा; मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

ठाण्यात नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा; मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

ठाणे:- पावसाळ्याच्या तोंडावरही ठाण्यात नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू असून अनेक भागांमध्ये नाले कचऱ्याने भरलेले आहेत. ठाणे महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपयांचे ठेके देऊन नालेसफाई करत असली तरी प्रत्यक्षात या कामात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत आहे. यामुळे ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नालेसफाई योग्यपद्धतीने न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यासाठी संबंधित प्रभाग अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देखरेख केली जाते. तरीही इंदिरा नगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, माजीवाडा, घोडबंदर रोड यांसारख्या भागांतील नाले अजूनही कचऱ्याने भरलेले आहेत. के विला परिसरात पहिल्याच पावसात मुख्य नाला तुंबल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अशाच प्रकारची परिस्थिती शहरातील इतर भागांमध्ये उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नालेसफाई करताना “डिसिल्टिंग” पद्धतीचा वापर करून संपूर्ण नाल्याची सफाई करणे बंधनकारक आहे. तसेच सफाईनंतरचा गाळ व कचरा तात्काळ डम्पिंग ग्राउंडवर हलवणे आवश्यक असताना, अनेक ठिकाणी तो नाल्याच्या कडेला किंवा पुन्हा नाल्याच्या आतच ढकलून ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासन दरवर्षी नालेसफाईसाठी नवीन योजना व तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करत असले, तरी ठेकेदारांकडून ही कामे केवळ कागदावर दाखवली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर केला आहे. सफाईचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्यावर, कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नालेसफाई अत्यंत महत्त्वाची असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून प्रामाणिक आणि पारदर्शक काम होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा जलमय होण्याचा धोका आहे.

प्रतिक्रिया
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व या सर्वस्वी ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल.
स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग मनसे.

error: Content is protected !!