Homeठाणे-मेट्रोठाण्यात 'मॉडेल करिअर सेंटर' व 'लाईट हाऊस' कौशल्य विकास केंद्राचे दिमाखदार उद्घाटन

ठाण्यात ‘मॉडेल करिअर सेंटर’ व ‘लाईट हाऊस’ कौशल्य विकास केंद्राचे दिमाखदार उद्घाटन

बाजारातील मागणीनुसार कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज–जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

ठाणे: तरुणांना रोजगाराच्या आधुनिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ‘लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मॉडेल करिअर सेंटर (MCC) ठाणे लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्राचे’ उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांच्या हस्ते या केंद्राचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनिल सदाफुले, जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या श्रीमती संध्या साळुंके, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा के. बन्सल, मुख्य प्रकल्प अधिकारी अमृता बहुलकर आणि सहसंचालक अतुल माने प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी बदलत्या पिढीच्या मानसिकतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, “पूर्वी पिढी बदलण्यासाठी २५-३० वर्षांचा काळ लागायचा, मात्र आता अवघ्या १०-१५ वर्षांतच वैचारिक तफावत जाणवू लागली आहे. आजच्या तरुणाईमध्ये अध्यात्माकडे कल वाढताना दिसत आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, बदलत्या काळात केवळ पदवी असून चालणार नाही, तर बाजारातील मागणीनुसार (Demand Assessment) स्वतःला अपडेट ठेवणे ही काळाची गरज आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विविध आधुनिक अभ्यासक्रमांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. कौशल्य विकास केंद्रामध्ये ई-व्हेईकल (e-Vehicles) व ड्रोन तंत्रज्ञान, ग्राफिक डिझायनिंग व डिजिटल मार्केटिंग, लॅपटॉप रिपेअरिंग व ऑफिस एक्झिक्युटिव्ह, पर्सनल ट्रेनर व न्यूट्रिशनिस्ट (पोषणतज्ज्ञ) या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी उदाहरण दिले की, आज मोठ्या रुग्णालयांमध्ये न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओथेरपिस्टना मोठी मागणी आहे. केवळ पदवी नसली तरी योग्य कौशल्य (Skills) आणि कामाप्रती प्रामाणिकपणा असेल, तर युवक उत्तम पॅकेज मिळवू शकतात.
या केंद्राची उभारणी ‘शासकीय-खाजगी भागीदारी’ (PPP Model) अंतर्गत करण्यात आली आहे. मराठवाडा एक्सलरेटर फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (MAGIC) सारख्या यशस्वी उपक्रमांचा संदर्भ देत त्यांनी ठाण्यातील या केंद्राच्या यशाबद्दल विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान एका विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या श्रीमती संध्या साळुंके यांनी केले.

error: Content is protected !!