भाजपचे कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन केली मागणी!
ठाणे:-ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये क्लस्टरच्या धर्तीवर समानता आणा अशी मागणी भाजपचे कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन केली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतही वन प्लस घरांना क्लस्टर प्रमाणे घरे मिळावीत,त्यामुळे झोपडपट्टी मद्धे राहणाऱ्या नागरिकांना देखील न्याय मिळेल असे कृष्णा पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या ठाण्यामध्ये क्लस्टर योजनचे काम सुरु आहे. यातून ठाणेकरांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्याच बरोबर एसआरए प्रकल्पही सुरु आहेत. या दोन्ही योजना झोपडपट्टीधारक तसेच अनधिकृत घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांसाठी मोठया वरदान दायक आहेत. यातील क्लस्टर मध्ये सहभागी होणाऱ्यांचा लाभ एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना होत नाही असे कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनात पाटील यांनी शासनाला काही सूचना केल्या आहेत.,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडीधारकांना ३०० चौ.फूट क्षेत्रफळाचे तर क्लस्टरमध्ये ३२५ चौ.फुटाचे घर मिळते.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून फक्त तळमजल्या वरील झोपडीधारकाला घर मिळते तर क्लस्टरमध्ये तळ अधिक वरील कितीही मजल्याच्या बांधकाम धारकाला घर मिळते. पात्रतेच्या निष्कर्षामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून इ.स. २००० पूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांना मोफत व १ जानेवारी २०११ पर्यंतच्या लाभार्थ्यांना ठराविक रक्कम भरून पात्र करण्यात येते. मात्र क्लस्टरमध्ये सुरुवातीला २०१४ पर्यंतच्या लाभार्थ्यांचा समावेश होता तो आता २०१९ पर्यंत करण्यात आला आहे. तसेच यासाठी विशेष अटींचाही समावेश नाही. याच अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्येही हे नियम लागू करण्यात यावे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून अनेकदा वेगवेगळे परिपत्रक काढण्यात येत असतात, मात्र ते प्राधान्याने मुंबईसाठीच काढण्यात येतात. त्याचा ठाणेकरांना लाभ होत नाही किंबहुना ते परिपत्रक ठाण्यात लागू होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जात असतो. त्यामुळे जे परिपत्रक मुंबईसाठी निघेल तेच त्याच वेळी ठाण्यातही लागू करण्यात यावे अशा महत्वपूर्ण सूचना कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
क्लस्टर मध्ये घरे मिळणारे व झोपडपट्टी मध्ये राहणारे ही सर्वसामान्य जनता आहे.या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून क्लस्टर आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समानता आणून झोपडपट्टी धारकांनाही एक अधिकच्या घरांना पात्र समजावे.जनतेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे -कृष्णा पाटील,माजी नगरसेवक
या दोन्ही योजनांचा लाभ हा प्राधान्याने सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचे पात्रता निकर्ष, क्षेत्रफळ व नागरिकांनी गरजेपोटी बांधलेल्या एक मजल्याचे बांधकाम समाविष्ट केल्यास याचा झोपडीधारकांना लाभ होऊ शकतो.
सदर पत्रावर विचार करून ठाण्यातील समस्त झोपडीधारकांना उपकृत करावे अशी विनंती ठाणेकरांच्या वतीने कृष्णा पाटील यांनी केली आहे.






