दिवा: – दिवा परिसरात शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांसाठी मोफत अँटी-रॅबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख श्री. अरुण लोकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय खात्याने हा उपक्रम राबवला.
शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून ए.एन.डी. कॉम्प्लेक्स भागातून या मोहिमेला सुरुवात झाली. मनपाच्या पथकांनी परिसरातील अनेक भटक्या श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस दिली.
या उपक्रमाविषयी बोलताना शाखाप्रमुख अरुण लोकरे यांनी सांगितले की, “रॅबीजची लस खाजगीरित्या देण्यासाठी खूप खर्च येतो, तो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. त्यामुळेच मनपाच्या सहकार्याने हा मोफत उपक्रम राबवण्यात आला आहे.”
याचबरोबर, श्री. लोकरे यांनी परिसरातील सर्व श्वानप्रेमींना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. “आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांनाही रॅबीजची लस मिळावी, यासाठी श्वानप्रेमींनी तत्पर राहावे आणि प्रशासनाच्या मदतीने लसीकरण करून घ्यावे,” असे ते म्हणाले. या मोफत लसीकरण मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी आणि श्वानप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.






