दिवा:-शीळ-दिवा रस्त्यावर विजेच्या ओव्हरहेड वायरवर अडकलेल्या कबुतराला वाचवताना विजेचा धक्का लागल्याने अग्निशमन दलाच्या एका २८ वर्षीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. उत्सव पाटील असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिव्यातील खर्डीगाव येथील सुदामा रेसिडेन्सीजवळ टोरंट पॉवर कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर एक कबूतर अडकले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक बचाव वाहनासह घटनास्थळी पोहोचले.
अग्निशमन दलाचे जवान कबुतराची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना, जवान उत्सव पाटील (वय २८, रा. आगासन गाव, दिवा) यांना ओव्हरहेड वायरमधील विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याच घटनेत त्यांचे सहकारी आझाद पाटील (वय २९, रा. वाडा, पालघर) यांच्या हाताला आणि छातीला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उप आयुक्त श्री. दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






