दिवा:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दिवा शहरात उभारण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), दिवा विभागाच्या वतीने कल्याण ग्रामीणचे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना निवेदन देण्यात आले. दिवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि दिवा स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाज दिवा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची मागणी करत आहे. ठाणे महापालिकेकडून दिवा स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे दिवा विभाग अध्यक्ष दिनेश पाटील म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा दिवामध्ये होणे अपेक्षित होते, परंतु तसे काही झाले नाही आणि इतर पक्षांनीही त्या संदर्भात काही भूमिका घेतली नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दोन्ही स्मारकांची मागणी स्थानिक आमदारांना करत आहोत. दिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे दिव्यातील लोकांना प्रेरणादायी ठरेल, यासाठी हे दोन्ही स्मारके दिवा शहरात असली पाहिजेत.”
सौरव आढांगळे, आरपीआय-ए युवक उपाध्यक्ष, दिवा विभाग यांनी सांगितले की,” आम्ही स्थानिक आमदार राजेश मोरे साहेब यांची भेट घेऊन रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात निवेदन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दिवा स्टेशन परिसरात असावा, अशी मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करत आहोत. भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी संघर्ष, आंदोलन करावे लागले तरी आमची तयारी आहे.”.या निवेदनामुळे दिवा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.