दिवा:दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २७ च्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असणारे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि भव्य रॅली काढून दाखल केला. या रॅलीतील जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जणू दिव्यात ‘भगवे वादळ’ आले असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शैलेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि विभाग प्रमुख उमेश भगत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शैलेश पाटील यांनी गेल्या दोन कार्यकाळात नगरसेवक म्हणून केलेल्या विकासकामांची पोचपावती आजच्या रॅलीत पाहायला मिळाली. दिव्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, प्रभाग क्रमांक २७ मधील नागरी समस्या सोडवण्यात पाटील यांचा मोठा वाटा राहिला आहे.
दिवा शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मत यावेळी शैलेश पाटील यांनी व्यक्त केले.






